
तब्बल 105 शस्त्रे, 7 किलो सोने व 3 कोटी रोख केली जमा
रायपूर, 31 मार्च (हिं.स.) : केंद्रीय गृहमंत्र्यांनी आत्मसमर्पणासाठी 31 मार्च 2026 पर्यंत दिलेल्या अंतिम मुदतीच्या शेवटच्या दिवशी बस्तर विभागातील 4 जिल्ह्यांत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी आत्मसमर्पण करणाऱ्या 33 नक्षल्यांनी तब्बल 105 घातक शस्त्रे, 3 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 7 किलो सोने देखील सुरक्षा दलांकडे सोपवले.
छत्तीसगडच्या बस्तर रेंजमधील 4 जिल्ह्यांमध्ये आज, मंगळवारी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान एकूण 33 नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश आले. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले. बीजापूर जिल्ह्यातून सर्वाधिक 25 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांच्याकडून 93 93 शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असून त्यात 4 एके-47 आणि 8 एसएलआर रायफल्सचा समावेश आहे. याशिवाय 14.06 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, ज्यामध्ये 2.90 कोटी रुपये रोख आणि 7.2 किलो सोने आहे. जप्त सोन्याची किंमत सुमारे 11.16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दंतेवाडा जिल्ह्यात 5 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांच्या ताब्यातून 8 एसएलआर रायफल्ससह इतर शस्त्रास्त्रे मिळाली. सुकमा जिल्ह्यात 2 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांच्याकडून एक एलएमजी, दोन एके-47 रायफल्स आणि 10 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. नारायणपूर जिल्ह्यात एलएमजीसह एका नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले.बीजापूरमधील ही कारवाई सुरक्षा दलांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. या संपूर्ण मोहिमेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी