
दिसपूर, 31 मार्च (हिं.स.)। आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील इंधन पुरवठा आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात एकही दिवस पेट्रोल-डिझेलची टंचाई भासू दिली नाही आणि गॅस पुरवठ्याची साखळीही अखंड सुरळीत ठेवण्यात आली.
फडणवीस म्हणाले की, जगभरात अनेक देश युद्धजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत. काही देशांमध्ये लॉकडाऊन लावण्याची वेळ आली, तर काहींनी आठवड्यातील कामाचे दिवस कमी केले. मात्र, भारतात जनजीवन विस्कळीत झाले नाही. हे प्रभावी व्यवस्थापन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले, असे त्यांनी नमूद केले.
त्याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करत म्हटले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही लोकांना रांगेत उभे राहावे लागले. पेचप्रसंगी जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले, जे अत्यंत चुकीचे होते. अशा प्रकारच्या राजकारणामुळे लोकांचा विश्वास काँग्रेसवरून उडाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
आसाममधील जनतेबद्दल बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरीब आणि वंचित घटकांविषयी विशेष आस्था आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. “ए फॉर आसाम” हा नारा केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरवण्यात आला आहे, त्यामुळे आसाममध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. याच कारणामुळे आसाममधील जनता मोदी आणि राज्याच्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, लोकांचा विश्वास संपादन करणे हे कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाचे असते. भाजप आणि मित्र पक्षांनी तो विश्वास मिळवला आहे. त्यामुळेच आसाममध्ये ते मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काँग्रेस मात्र जनतेचा विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरत असून, त्यामुळेच त्यांना निवडणुकांमध्ये यश मिळत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule