लातूर : काॅपर वायर चोरी प्रकरणांचा उलगडा; पाच आंतरराज्यीय आरोपी अटकेत
लातूर, 31 मार्च, (हिं.स.)। उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कॉपर वायर चोरीच्या सलग घटनांचा पोलिसांनी यशस्वी उलगडा करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून 72,880 रुपये किम
पोलीस कारवाई


लातूर, 31 मार्च, (हिं.स.)। उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कॉपर वायर चोरीच्या सलग घटनांचा पोलिसांनी यशस्वी उलगडा करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून 72,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींना जोडलेल्या कॉपर वायरची चोरी करून मोठे आर्थिक नुकसान करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 78/2026 व 80/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

फिर्यादी बालाजी धनराज तरवडे व इतर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, 26 ते 27 मार्च दरम्यान एकुर्का रोड परिसरातील साठवण तलावाजवळील डी.पी.वरून सुमारे 1050 मीटर कॉपर वायर चोरीस गेली होती. तसेच डांगेवाडी परिसरातून 461 मीटर वायर चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांमध्ये एकूण 72,880 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.

या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाढवणा पाटी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी मध्यप्रदेश राज्यातील असून त्यांची नावे रिहाईस जिवराज पवार, सुजेश नवाब पवार, दुकीस मलबकस पवार, सासन सार्जन पवार आणि बबू जिवराज पवार अशी आहेत.

तपासात आरोपी वाढवणा, अहमदपूर, जळकोट, उदगीर तसेच कर्नाटकातील कमलनगर परिसरात अशा प्रकारच्या चोऱ्या करत असल्याचे उघड झाले. चोरी केलेले वायर जाळून त्यातील तांबे वेगळे करून विक्री करण्याची त्यांची पद्धत असल्याचेही समोर आले आहे.

अटक आरोपींपैकी एका आरोपीकडून सुमारे 23 किलो कॉपर वायर जप्त करण्यात आले असून रेडमी, विवो आणि आयक्यू कंपनीचे चार मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच “प्युअर गोल्ड 999” असा ठसा असलेले बनावट पितळ धातूचे बिस्किटही पोलिसांना आढळून आले असून त्याद्वारे फसवणुकीचा गुन्हा झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांना आवाहन : गावात किंवा शेत परिसरात अनोळखी व्यक्ती किंवा टोळी संशयास्पद हालचाली करताना आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande