
नाशिक, 01 एप्रिल (हिं.स.) : दुचाकीने जात असलेल्या होमगार्ड तरुणीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पाथर्डी-वडनेर रोड परिसरात राहणारी असून ती होमगार्डमध्ये कार्यरत आहे. मंगळवारी (दि. 31) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ती पाथर्डी फाट्याकडून मोटारसायकलीने पांडवलेण्याकडे जात होती. दरम्यान, हॉटेल ताजसमोरील उड्डाणपुलाखालील बोगद्याजवळ ती पोहोचली असता, ओमनी गाडीवरील चालक श्याम मुकुंद तपासे (रा. गौळाणे, ता. जि. नाशिक) याने तिचा रस्ता अडवला. त्याने पीडितेला समाधान बन्सी जाधव याच्याकडून दहा लाख रुपये घेतल्याबाबत विचारणा केली. यावर पीडितेने त्याला उलट प्रश्न विचारताच आरोपीने संतापून तिचा अपमान केला.
त्यानंतर आरोपीने पीडितेचा हात पकडून तिचा विनयभंग केला तसेच तिला मारहाण करत समाधान जाधवविरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. “तक्रार मागे घेतली नाही तर गाडीखाली चिरडून टाकीन,” अशीही धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी श्याम तपासे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV