लातूर : लाचखोरी प्रकरणात दोन सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा
लातूर, 01 एप्रिल (हिं.स.) : लाच स्वीकारल्याप्रकरणी सहकारी विभागातील दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल 1 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आला.या प्रकरणात सह निबंधक (दुग्ध) म
लाच प्रकरणी शिक्षा


लातूर, 01 एप्रिल (हिं.स.) : लाच स्वीकारल्याप्रकरणी सहकारी विभागातील दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल 1 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आला.या प्रकरणात सह निबंधक (दुग्ध) म्हणून कार्यरत असलेले बालाजी विठ्ठलराव काळे आणि कनिष्ठ लिपिक सुरेश राघोबा माळी यांना न्यायालयाने दोषी ठरवले. संबंधित गुन्हा 2012 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.

तपासानुसार, फिर्यादीचा मत्स्य व्यवसायासाठीचा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी आरोपींनी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. आरोपी क्रमांक दोन यांनी ही रक्कम आरोपी क्रमांक एक यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांनी केला होता. तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक जे. आर. भंडारवार यांनी काम पाहिले, तर सरकारी बाजूने सहाय्यक शासकीय अभियोक्ता रमाकांत चव्हाण यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.

न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनुसार, बालाजी काळे यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत 2 वर्षे 6 महिने साधा कारावास व 15 हजार रुपये दंड, तसेच कलम 13(2) अंतर्गत 3 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

तसेच सुरेश माळी यांना कलम 12 अंतर्गत 2 वर्षे साधा कारावास व 7,500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांच्या न्यायालयात पार पडली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाचखोरीविरोधात कठोर संदेश गेला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande