गडचिरोलीत ९ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली, ३१ मार्च : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले असून, आज ९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये ३ वरिष्ठ एसीएम (ACM) स्तरावरील माओवाद्यांचा समावेश असून, या सर्वांवर मिळून ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते
आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सोबत पोलीस अधिकारी


गडचिरोली, ३१ मार्च : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले असून, आज ९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये ३ वरिष्ठ एसीएम (ACM) स्तरावरील माओवाद्यांचा समावेश असून, या सर्वांवर मिळून ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

या कारवाईत विशेष बाब म्हणजे दोन महिला माओवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह शरणागती पत्करली. शांती वंजा वड्डे हिने एके-४७ रायफल आणि ३० जिवंत काडतुसांसह आत्मसमर्पण केले, तर सुक्की बामी कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह हिंसेचा मार्ग सोडला.

शस्त्रसाठा जप्त

आत्मसमर्पणानंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कुमनार व गुंडापुरी जंगल परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला. यात एसएलआर रायफल, वॉकीटॉकी, डेटोनेटर आणि पेनड्राइव्ह यांचा समावेश आहे.

आत्मसमर्पित माओवादी

दसली ऊर्फ पिडे सन्नु वेको (एसीएम) – बक्षीस ६ लाख

रामजी अडमा पोटाम (एसीएम) – बक्षीस ६ लाख

शांती वंजा वड्डे (एसीएम) – बक्षीस ६ लाख

मनकु मासो पोडाम – बक्षीस २ लाख

सरिता रामा वेलकम – बक्षीस २ लाख

लखमी आयतु कुंजाम – बक्षीस २ लाख

नंदे जोगा मडे – बक्षीस २ लाख

राकेश कोरके मज्जी – बक्षीस २ लाख

सुक्की बामी कुंजाम – बक्षीस २ लाख

माओवादी चळवळ शेवटच्या टप्प्यात

जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून ती केवळ भामरागडच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर चळवळीला मोठा धक्का बसला होता. २०२५ पासून आतापर्यंत १३२ माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला असून, एकूण आत्मसमर्पितांची संख्या ८०५ वर पोहोचली आहे.

पुनर्वसनासाठी शासनाची मदत

आत्मसमर्पित माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ४.५ ते ५.५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. याशिवाय, गटाने आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त ४ लाख रुपयांचे प्रोत्साहन दिले जाते.

अधिकाऱ्यांची उपस्थिती

या प्रसंगी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, CRPF चे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पोलीस दलाने माओवाद्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा आणि सन्मानाने जीवन जगावे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande