
जळगाव, 31 मार्च, (हिं.स.) - यावल तालुक्यात लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून वनविभागातील एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करत असून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित वनरक्षकाने पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पैशांची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. मात्र कारवाईदरम्यान आरोपीला संशय आल्याने त्याने प्रत्यक्ष पैसे स्वीकारले नाहीत. तरी देखील लाच मागितल्याचे पुरावे मिळाल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर