
गांधीनगर , 31 मार्च (हिं.स.)।गुजरातमधील सुरत येथून एका भीषण दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. लिंबायत परिसरातील मीठी खाडी जवळील एका सोसायटीच्या इमारतीत अचानक आग लागली. या घटनेत एका लहान मुलासह पाच जण गंभीररीत्या भाजले. सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान पाचही जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या लिंबायत भागातील मीठी खाडी जवळील एका घरात अचानक आग लागली. या आगीत एक महिला आणि एका बालकासह एकूण पाच जण भाजले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आग लागताच तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली होती. अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, या घटनेत एकाच कुटुंबातील शाहनाज बेगम अब्दुल कलाम अन्सारी (वय ६५ वर्षे), हुशा बेगम अब्दुल कलाम अन्सारी (वय १८ वर्षे), शुभान रमजान अली अन्सारी (वय ४ वर्षे), शबीना रमजान अली अन्सारी (वय २८ वर्षे), परवीन अब्दुल कलाम अन्सारी (वय १९ वर्षे) यांचा मत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात संबंधित खोलीत मोठ्या प्रमाणात साड्या साठवून ठेवलेल्या असल्याचे आढळून आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला असून परिसरात सर्वत्र धूर पसरला होता.या घटनेनंतर माजी महापौर दक्षेशभाई मावाणी, डीसीपी तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode