
नवी दिल्ली , 05 मार्च (हिं.स.)।अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने ठामपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए ) हे दावे निराधार आणि बनावट असल्याचे सांगत स्पष्ट केले की त्यामध्ये कोणतीही तथ्यात्मकता नाही.
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वर म्हटले की, “अशा निराधार आणि मनगढंत टिप्पणींपासून दूर राहण्याचा आम्ही सल्ला देतो.” मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारत कोणत्याही देशाला इराणविरुद्ध लष्करी हल्ल्यांसाठी आपल्या बंदरांचा वापर करण्याची परवानगी देत नाही. यासोबतच भारताने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव आणखी वाढू न देण्याचे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
ही प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी सैन्य अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर आली. त्यांनी एका अमेरिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, इराणसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेचे अनेक नौदल तळ नष्ट झाले असून आता त्यांना भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मॅकग्रेगर यांनी असे म्हटले होते, “आमचे सर्व बेस नष्ट झाले आहेत, आमची बंदर व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली आहे. आता आम्हाला भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे, जे आदर्श परिस्थिती नाही.”
दरम्यान,आज गुरुवारी हे युद्ध सहाव्या दिवशी पोहोचले असून सध्या तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अहवालानुसार आतापर्यंत इराणमध्ये 1,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्ये सुमारे डझनभर लोक ठार झाल्याची माहिती आहे.
या युद्धाची सुरुवात शनिवारी झाली. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये 86 वर्षीय इराणी सर्वोच्च नेता आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रदेशातील तणाव झपाट्याने वाढला आहे.जवाबी कारवाई म्हणून इराणने इस्रायल आणि खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode