
अमरावती, 06 मार्च (हिं.स.)। मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सध्या होळीचा जोर कायम आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाशी समरस होऊन आपले जीवन व्यतीत करणाऱ्या आदिवासी बांधवांची ठिकठिकाणी आयोजित मेघनाथ यात्रेत चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. जारिदा येथे आयोजित मेघनाथ यात्रेत आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. गावाच्या मध्यभागी मेघनाथ स्तंभ असतो. यात्रेच्या प्रसंगी बाबा मेघनाथ यांची आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धाने पूजा करतात. या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे हा स्तंभ जवळजवळ शंभर ते दीडशे फूट उंच असतो. ज्या व्यक्तीचा नवस पूर्ण झाला असेल, ती व्यक्ती स्वतःहून त्या खांबाला लटकून घेते व दोरीच्या साह्याने पाच फेऱ्या त्याला या उंच खांबावर फिरविल्या जाते. कोंबडी व बकरेसुद्धा नवसामध्ये दिल्या जातात. यात्रेत परिसरातील ३० ते ४० गावांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अनेकांना आर्थिक बळ यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाल्यामुळे या भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना चांगलेच आर्थिक बळ मिळाले. यात्रेतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळाले असून लाखो रुपयांची उलाढाल झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी