
लातूर, 06 मार्च (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक; शेतकरी कर्जमाफी आणि 'अजितदादां'च्या स्मारकासाठी मानले आभार.महाराष्ट्र राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प हा राज्याला प्रगतीची नवी दिशा देणारा आहे. मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून, विकसित भारताच्या स्वप्नात महाराष्ट्राची भूमिका यातून अधोरेखित झाली आहे, अशा शब्दांत राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीचा निर्णय
अर्थसंकल्पावर भाष्य करताना ना. बाबासाहेब पाटील म्हणाले की, शेतकरी हा या राज्याचा कणा आहे. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या जीवनात स्थैर्य येईल.
स्व. अजित पवार दादांना अर्थसंकल्प समर्पित; स्मारकाची घोषणा
या अर्थसंकल्पाचे विशेष महत्त्व सांगताना नामदार पाटील भावूक झाले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प आमचे नेते स्वर्गीय अजित पवार दादा यांना समर्पित केला आहे. ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. दादांचे भव्य स्मारक आणि त्यांच्या नावाने अनेक लोकोपयोगी योजनांची घोषणा केल्याबद्दल मी या राज्याचा मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
२०४७ च्या विकसित भारताचे स्वप्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे जे ध्येय ठेवले आहे, त्यात महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आजच्या अर्थसंकल्पातून हेच स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन म्हणून काम करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.एकूणच, पायाभूत सुविधा, शेती आणि सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया नामदार बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis