
अकोला, 06 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची ६ मार्च २०२६ रोजी (तिथीनुसार) जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठया उत्साहात शिवजयंती पार पडली. यंदा शिवजयंतीचे ३२ वे वर्ष होते. हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या देखण्या किल्ले पुरंदरवर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे डॉ. सुनिल लहाने यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार नितीन देशमुख, माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले, किशोर मांगटे पाटील, गोपाल दातकर, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, सोनाली सरोदे, मनोज पाटील, अभय खुमकर, मधुर खंडेलवाल, प्रशंसा अंबेरे, राहुल कराळे, रवि गोतमारे, विजय इंगळे, पंकज गावंडे, राजेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांनी काढली मशाल यात्रा!
गुरुवार ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी नगरस्थित आई तुळजाभवानी मंदिर येथून महिलांच्या मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मशाल यात्रेचा समारोप जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला व युवतींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व त्यानंतर आरती करण्यात आली.
मान्यवरांचा केला सन्मान!
आयोजकांच्या वतीने
उद्धव सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने, शिंदेंसेनेचे नेते गोपिकीशन बाजोरिया, साहित्य क्षेत्रातून डॉ. शैलेंद्र दुबे, क्रीडा क्षेत्रातून मृणालिनी गाढे, वेदश्री योगेश गोतमारे तसेच अर्पिता आनंद बुलबुले यांचा सत्कार करण्यात आला.
डाबकी रोड परिसरात विशाल मिरवणूक!
सायंकाळी ७ वाजता डाबकी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या महिला, युवती व चिमुकल्या मावळ्यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी नगरस्थित भाजी बाजार येथील शिवरायांच्या प्रतिमेसमोर करण्यात आला. शनिवार ७ मार्च रोजी रात्री ८ वाजता शिवपूजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप केला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे