
मुंबई, 06 मार्च (हिं.स.) : भक्तीगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित पं. अजितकुमार कडकडे यांची विशेष ‘संगीत रजनी’ दिनांक १८ मार्च,रोजी, रात्री ८.३० वा बोरीवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
'दर्शन क्रिएशन्स' आणि 'शु-हर्ष इंटरप्राइझेस' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भक्ती, नाट्यसंगीत आणि भावगीतांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.
या संगीत रजनीत पं. अजितकुमार कडकडे आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि कालातीत रचना सादर करणार आहेत. ‘करा हो’, ‘गुरूचा जयजयकार’, ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’, ‘ओम श्री साईबाबा’, ‘गण गण गणात बोते’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘ओम नमः शिवाय’ यांसारख्या भक्तिमय गीतांचा आनंद रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
पं. अजितकुमार कडकडे यांच्या चाहत्यांची 'पं. अजितकुमार कडकडे संगीत रजनी' व्हावी इच्छा होती, हीच भावना लक्षात घेऊन दर्शन क्रिएशन्स आणि शु-हर्ष इंटरप्राइझेस यांनी पुढाकार घेत पंडितजींना विनंती केली असता त्यांनी रसिकांसाठी आनंदाने होकार दिला, असे आयोजक समीर बापर्डेकर यांनी सांगितले.
हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे बुधवार, १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता सादर होणार आहे. “पं. अजित कडकडे संगीत रजनी मध्ये पंडितजींच्या अवीट गोडीच्या रचना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार असल्याचे आयोजक समीर बापर्डेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे ओघवते आणि अभ्यासपूर्ण निरूपण अनघा मोडक करणार असून, संपूर्ण रजनी भक्तीरस, भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि सुरेल सादरीकरणाने सजलेली असेल. अशा दुर्मिळ आणि उच्च दर्जाच्या कार्यक्रमांची संधी क्वचितच लाभत असल्याने रसिकांनी या सशुल्क संगीत सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 9769977380
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी