
अकोला, 06 मार्च (हिं.स.) । राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ फुगीर आकड्यांचा खेळ असून तो शेतकरी, ग्रामीण भाग आणि युवकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असल्याची टीका आमदार पठाण यांनी केली. विकसित भारत 2047 चे स्वप्न दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस पावले उचलली जात नसल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे आधीच अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठोस योजना किंवा हमीभावाबाबत स्पष्ट धोरण अर्थसंकल्पात नसल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, सिंचन, शेतीपूरक उद्योग आणि शिक्षण-रोजगाराकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. युवकांसाठी रोजगारनिर्मिती व कौशल्य विकासाबाबतही ठोस निर्णय नसल्याने नाराजी वाढू शकते, असे ते म्हणाले.
घोषणांपेक्षा लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारी धोरणे सरकारने स्वीकारावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे