

अकोला, 06 मार्च (हिं.स.)।दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दल (RPF) प्रवाशांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत असून “ऑपरेशन अमानत” या उपक्रमांतर्गत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तत्परता व प्रामाणिकपणा दाखवत हरवलेली मालमत्ता प्रवाशांना सुरक्षितपणे परत दिली.
पहिल्या घटनेत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे दिनांक 02/03 मार्च 2026 रोजी रात्री 22.00 ते 06.00 या वेळेत गस्त घालत असताना नंदू सिंह बैनाडे, हेड कॉन्स्टेबल-६१४५ यांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चार्जिंगसाठी ठेवलेला एक मोबाईल फोन आढळून आला. त्या ठिकाणी आसपास कोणीही प्रवासी नसल्याने त्यांनी प्रवाशांकडे चौकशी केली; मात्र मोबाईलचा मालक समोर आला नाही.
त्यानंतर संबंधित मोबाईल फोन आरपीएफ पोस्ट, सीपीएसएन येथे आणून सुरक्षित ठेवण्यात आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्याच दिवशी नंतर सरजेऱाव पिराजी लळजरे, रा. छत्रपती संभाजीनगर, यांनी आरपीएफ पोस्ट येथे येऊन आपल्या मुलाचा मोबाईल फोन स्टेशनवर चार्जिंगला ठेवून घाईत विसरल्याची माहिती दिली. त्यांचा मुलगा व त्याचे मित्र साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक येथे प्रवासासाठी आले होते. सदर मोबाईल Realme (रियलमी) कंपनीचा असून त्याची किंमत अंदाजे ₹12,000/- आहे.
योग्य पडताळणी केल्यानंतर इन्स्पेक्टर / आर पी एफ यांच्या देखरेखीखाली संबंधित मोबाईल फोन प्राप्तीची पावती घेऊन त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत विभागीय सेकुरीटी कंट्रोल /नांदेड यांच्याकडून गाडी क्र.. 17417 एक्स्प्रेस मध्ये विसरलेली करड्या रंगाची मिनी हँडबॅग याबाबत तक्रार प्राप्त झाली. तक्रार मिळताच श्री प्रविण कुमार, कॉन्स्टेबल/2121/नागरसोल यांनी रेल्वे गाडी नगरसोल रेल्वे स्थानक येथे पोहोचल्यावर कोच क्रमांक B-2, बर्थ क्रमांक 33 येथे शोध घेतला. शोधादरम्यान करड्या रंगाची मिनी हँडबॅग मिळून आली.
सदर हँडबॅग आरपीएफ पोस्ट, नागरसोल येथे सुरक्षित ठेवण्यात आली. त्या बॅगेत ₹8,000/- रोख रक्कम, हेडफोन व चार्जर, मनगटी घड्याळ, एटीएम कार्ड, ओळखपत्रे, कागदपत्रे व इतर वस्तू मिळून एकूण अंदाजे ₹12,000 /- किंमतीचा माल आढळून आला.
सदर प्रवासी तारक भुतडा, रा. छत्रपती संभाजीनगर, यांनी तिरुपती रेल्वे स्थानक येथून छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास करताना ही बॅग गाडीत विसरल्याचे सांगितले. त्यानंतर ते नागरसोल रेल्वे स्थानकावर आले. आधार कार्डद्वारे ओळख पडताळणी केल्यानंतर सदर हँडबॅग व त्यातील सर्व साहित्य त्यांना सुपूर्द करण्यात आले.
आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या तत्परता व प्रामाणिकपणाबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या दोन्ही घटना “ऑपरेशन अमानत” अंतर्गत आरपीएफ नांदेड विभाग प्रवाशांच्या सेवेसाठी व त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे