मुंबई महापालिकेतील सहा प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध
मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत अखेर सहा प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. विविध प्रभाग समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी विरोधात कोणतीही उमेदवारी कायम न राहिल्याने न
BMC Elections six ward committees


मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत अखेर सहा प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. विविध प्रभाग समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी विरोधात कोणतीही उमेदवारी कायम न राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे या प्रभागांतील अध्यक्षांची औपचारिक निवड निश्चित झाली आहे. या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राजकीय समीकरणेही बदलल्याची चर्चा रंगली आहे.

विशेषतः जी-उत्तर प्रभाग समितीत राजकीय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधले. सुरुवातीला या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये थेट लढत होण्याची शक्यता होती. ठाकरे गटाचे जोसेफ कोळी आणि मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या पंधरा मिनिटे आधी जोसेफ कोळी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेचे यशवंत किल्लेदार यांची जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर ठाकरे गट आणि मनसे यांच्यात समन्वय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, इतर प्रभाग समित्यांमध्येही बिनविरोध निवडी झाल्या आहेत. एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समितीत शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिणी कांबळे यांची निवड झाली. के-पश्चिम प्रभाग समितीत भाजपचे रोहन राठोड, तर के-दक्षिण आणि के-उत्तर प्रभाग समितीत भाजपचे प्रकाश मुसळे अध्यक्षपदी निवडले गेले. पी-दक्षिण प्रभाग समितीत भाजपच्या श्रीकला पिल्ले यांची निवड झाली असून जी-दक्षिण प्रभाग समितीत शिवसेना ठाकरे गटाच्या पद्मजा चेंबूरकर अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

याशिवाय काही प्रभागांमध्ये थेट लढतीत निकाल लागले. सी आणि डी प्रभाग समितीत भाजपचे आकाश पुरोहित बिनविरोध निवडून आले. ए, बी आणि ई प्रभाग समितीत काँग्रेसचे ज्ञानराज निकम यांनी भाजपचे रोहिदास लोखंडे यांचा पराभव केला. एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर प्रभाग समितीत शिंदे गटाच्या मानसी सातमकर यांनी ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव केला. तसेच आर-उत्तर आणि आर-मध्य प्रभाग समितीत भाजपचे प्रकाश दरेकर, तर आर-दक्षिण प्रभाग समितीत भाजपच्या लीना देहेरकर बिनविरोध निवडून आल्या. पी-पूर्व आणि पी-पश्चिम प्रभाग समितीत काँग्रेसचे हैदर अली शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित रावराणे यांचा पराभव केला. या निवडणुकांमुळे मुंबई महापालिकेतील स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande