
कोल्हापूर, 06 मार्च (हिं.स.) : सार्वजनिक ठिकाणी बोगस उपचार देणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य सचिव आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत यांनी दिले.
बोगस वैद्यकीय व्यवसायाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश कवटीकवार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. व्ही.ए. अरादेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. दीपक लाडे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आदी उपस्थित होते.
बैठकीत निर्णय झाला की सार्वजनिक ठिकाणी, वर्तमानपत्रांत किंवा भिंतींवर जाहिराती देणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करावी. तसेच रस्त्याच्या कडेला गाड्या लावून उपचाराचा दावा करणाऱ्या अमान्यता प्राप्त लोकांवरही पोलीस कारवाई करतील. आवश्यक वैद्यकीय पदवी किंवा कौशल्य नसलेल्या व्यक्तींच्या उपचारांवर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन संयुक्तपणे गुन्हे दाखल करतील, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत डॉक्टरांची यादी जिल्हा परिषद, कोल्हापूर च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. दीपक लाडे यांनी दिली.
-------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar