
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिले आहेत, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली. सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या निर्णयामुळे शासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला असून आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच येत्या जूनपासूनच सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. सोलापूरसाठी मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इतर शहरात वळविण्यात आले. याबाबत मागणी केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करून सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळवून दिली.
तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ३४ एकर जागेवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करता येईल. याकरिता २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून याच अर्थसंकल्पात त्याकरिता तरतूद करावी आणि येत्या जून महिन्यापासून हे महाविद्यालय सोलापूरात सुरू व्हावे अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी २५ फेब्रुवारी रोजी चालू अधिवेशनात केली होती. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटही घेतली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड