रायगड : डॉ. ज्योती वाघमारे राज्यसभेच्या रिंगणात
रायगड, 06 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार आधीच जाहीर केले होते. मात्र शिवसेनेकडून कोण
Dr. Jyoti Waghmare, leaving behind big names, enters the Rajya Sabha fray


रायगड, 06 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार आधीच जाहीर केले होते. मात्र शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

अनेक बड्या आणि चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत एका उच्चशिक्षित आणि तळागाळातील महिला कार्यकर्त्याला राज्यसभेची संधी देत शिंदे यांनी राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का दिला आहे. डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील असून त्या गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या तसेच धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर शिंदे गटाची भूमिका विविध माध्यमांमध्ये ठामपणे मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. दसरा मेळाव्यातील त्यांच्या घणाघाती भाषणांमुळे त्या विशेष चर्चेत आल्या होत्या. विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणाऱ्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.डॉ. वाघमारे यांचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. त्यांनीही सामाजिक कार्यातून आपली वाटचाल सुरू केली. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी पदवी मिळवली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांच्या या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande