
नाशिक, 06 मार्च (हिं.स.) : पंचवटी परिसरातील पारंपरिक रंगपंचमी उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून, श्री सरदार रास्ते आखाडा तालीम संघ व श्री शनि चौक मित्र मंडळ यांच्या वतीने रहाड खोदण्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शनि चौकातील पारंपरिक रहाड पुन्हा तयार करण्यासाठी विधिवत पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते शेखर उत्तमरावजी ढिकले यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर टिकाव मारून रहाड खोदण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून या कामाला सुरुवात करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी श्री शनि चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सक्षम पटाईत, कार्याध्यक्ष विवेक मोर्य, उपाध्यक्ष प्रणव वाघ, खजिनदार स्वप्निल परदेशी यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून रहाड खोदण्याच्या कामाचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. रंगपंचमीच्या दिवशी शनि चौकात पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा केला जाणार असून, यासाठी परिसरात तयारीला वेग आला आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV