
लातूर, 06 मार्च, (हिं.स.) : बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून पदोन्नती मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एका शिक्षकासह मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती मिळवण्यासाठी बनावट ठराव तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधितांनी खोट्या सही-शिक्क्यांच्या आधारे कागदपत्रे तयार करून पदोन्नती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने प्रकरणाची दखल घेत आदेश दिल्यानंतर पोलिसांनी औसा तालुक्यातील खरोसा येथील नवभारत विद्यालयातील शिक्षक आणि मुख्याध्यापकावर गुन्हा नोंद केला आहे.
बनावट कागदपत्रे व खोट्या ठरावाच्या आधारे पदोन्नती मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis