
“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १”
रायगड, 06 मार्च (हिं.स.) । राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १” सुरू केले आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत महसूल मंडळ तसेच नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर एक दिवसीय शिबिरे आयोजित केली जातील.
या शिबिरांद्वारे नागरिकांना घरबसल्या विविध महसूल सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. अभियानाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन अडचणी त्वरित सोडवणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींची जनजागृती करणे, डिजिटल सेवांचा वापर वाढवणे आणि ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’द्वारे एकाच दिवशी सेवा प्रदान करणे हा आहे.
शासकीय वेळापत्रकानुसार, पूर्वतयारी १८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान करण्यात आली असून, शिबिरांचे आयोजन खालीलप्रमाणे केले आहे:
मार्च: ७ व १४ मार्च
एप्रिल: १० व १७ एप्रिल
मे: नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर ८ व १५ मे
या शिबिरांमध्ये ७/१२ व ८-अ उताऱ्यांमधील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार प्रकरणे, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज व वितरण, जमीन वर्ग बदल, डिजिटल ७/१२ मार्गदर्शन, अकृषिक (NA) परवानगीच्या नव्या तरतुदी, एकवेळचे अधिमूल्य भरण्याची प्रक्रिया आणि महाभूमी पोर्टल वापराबाबत माहिती दिली जाणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत आहे. जिल्हाधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना या शिबिरांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके