
लातूर, 06 मार्च (हिं.स.)।
लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील शिरूर ताजबंद येथील उड्डाणपुलावर आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास द्राक्षांनी भरलेला एक ट्रक भीषण अपघातात उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या उड्डाणपुलावरील धोकादायक वळणामुळे हा परिसर आता मृत्यूचा सापळा अर्थात 'ब्लॅक स्पॉट' बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरकडून नांदेडकडे द्राक्ष घेऊन जाणारा ट्रक (क्र. WB 23M9786) शिरूर ताजबंद येथील उदगीर रोडवरील उड्डाणपुलावरून जात असताना पहाटे ४.३० च्या सुमारास अचानक पलटी झाला. ट्रक पलटी होताच द्राक्षांचे क्रेट्स रस्त्यावर विखुरले गेले. पहाटेची वेळ असूनही अपघाताची बातमी समजताच आजूबाजूच्या काही नागरिकांनी माणुसकी विसरून मदतीऐवजी द्राक्षांचे क्रेट्स लांबवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडवली.
खाकी वर्दीची तत्परता: साळवे आणि जायभाये धावले मदतीला
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार साळवे आणि पोलीस नाईक केशव जायभाये यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले द्राक्ष नेण्यासाठी लोकांची जी चेंगराचेंगरी सुरू होती, तिला पांगवत पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बाजूला करून रस्ता मोकळा केला, ज्यामुळे पुढील संभाव्य मोठा अपघात टळला.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis