
दोन विद्यार्थ्यांसह पालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू अमरावती, 06 मार्च (हिं.स.) संपुर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या येथील शालांत परीक्षा पेपरफूट आणि चोरीप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले तर विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे उडाली आहे. शिक्षण विभागात मोठी खळबळ विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर लिहिला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. चोरीला गेलेला पेपर विद्यार्थ्यांनी चक्क आपापल्या घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे पालक प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
मोठे मासे लागणार गळाला याप्रकरणातील काही म्होरके अद्याप मोकाटच असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी काहींना जेरबंद केले तसेच तपास पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले असले, तरी या रॅकेटमधील 'काही मासे' अद्याप मोकाट असल्याची जोरदार चर्चा जनमानसात आहे. फरार असलेल्या एका संशयिताच्या अटकेनंतर या साखळीतील मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी