कोल्हापूर परिमंडळातील आरोग्य संस्थांमधील कंत्राटी सेवांची तपासणी सुरू
कोल्हापूर, 06 मार्च, (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने विविध सेवा पुरविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने आहार सेवा, स्वच्छता सेवा, वस्त्र धुलाई सेवा, कंत्राटी कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरविणे आ
कोल्हापूर परिमंडळातील आरोग्य संस्थांमधील कंत्राटी सेवांची तपासणी सुरू


कोल्हापूर, 06 मार्च, (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने विविध सेवा पुरविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने आहार सेवा, स्वच्छता सेवा, वस्त्र धुलाई सेवा, कंत्राटी कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरविणे आदी सेवांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या निर्देशानुसार कंत्राटी सेवांची गुणवत्ता व दर्जा तसेच कंत्राटी पद्धतीने कार्यरत मनुष्यबळ यांना दिले जाणारे वेतन शासकीय नियम व अटींनुसार अदा करण्यात येते अथवा नाही याची खात्री करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर परिमंडळातील आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे.

कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अशा एकूण ६४ आरोग्य संस्था आहेत. त्यापैकी २५ टक्के आरोग्य संस्था लकी ड्रॉ पद्धतीने निवडल्या असून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरु असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणी दरम्यान कंत्राटी स्वरूपात पुरविण्यात येणाऱ्या सेवांमध्ये अथवा संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी अथवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande