
नाशिक, 06 मार्च (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील जलसाठा क्षमता वाढविणे, भूजल पातळी सुधारणा करणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकरी सीमा अहिरे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृह येथे आज गाळमुक्त् धरण- गाळयुक्त शिवार योजनेबाबत आढावा बैठकीत श्रीमती अहिरे बोलत होत्या.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी रा.हि.झुरावत, जलसंधारण अधिकारी तुषार पाटील, पुष्कर दवंगे, प्रियंका भडके, आदित्य गुजराथी, सुवर्णा सानप, मंगेश टोपले, तांत्रिक सहाय्यक (EGS) एस.डी. तुपलोंढे, जिल्हा प्रकल्प समन्वयक गणेश शिंदे, यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी अहिरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे, तलाव, बंधारे तसेच जलसाठ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढल्यामुळे जलसाठा क्षमता वाढण्यास मोठी मदत होते. तसेच हा गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता वाढण्यासही मदत होते. गावपातळीवर जनजागृती करून अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे. गाळ उपसासाठी आवश्यक परवानग्या, यंत्रसामग्री व वाहतूक व्यवस्था याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. जलयुक्त शिवार योजनेतील प्रगतीपथावर असलेली कामे मार्चअखेर पूर्ण करावीत.
कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे जीओ टॅगिंग करणे आवश्यक असून त्याशिवाय पुढील मागणीचे प्रस्ताव मान्य होणार नाहीत. पाणलोट समित्यांनी करण्यात आलेल्या कामांचा खर्च, उपलब्ध निधी, करण्यात आलेले देयक व्यवहार तसेच उर्वरित निधी यांचा ताळेबंद नियमित तयार सादर करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिरे यांनी दिल्या. नाला खोलीकरण करताना पर्यावरणीय संतुलन अबाधित राहील याची खबरदारी घ्यावी. कामांची मोजमापे, खोली, रुंदी तसेच गाळ काढण्याची प्रक्रिया तांत्रिक मानकांनुसारच करण्यात यावी. कामे सुरू करण्यापूर्वी आवश्यक प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता तसेच इतर आवश्यक परवानग्या घेऊनच कामे हाती घ्यावीत. कामांची गुणवत्ता राखण्यासाठी संबंधित विभागांनी नियमित तपासणी करावी व प्रगतीचा आढावा सादर करावा, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री झुरावत यांनी सांगितले. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV