रायगड - शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात ८ ते २२ मार्चदरम्यान ‘जलमहोत्सव’
रायगड, 06 मार्च, (हिं.स.)। देशातील ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी ८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘जलमहोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी जल जीवन मिशन अंतर्
jal


रायगड, 06 मार्च, (हिं.स.)। देशातील ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी ८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘जलमहोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प संचालक शुभांगी नाखले यांनी दिली.

पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब नसून ती एक सांस्कृतिक मूल्य आहे. त्यामुळे पाण्याची जपणूक व संवर्धन ही सामूहिक जबाबदारी मानून स्थानिक परंपरांचा वापर करून जलसंवर्धनासाठी जनजागृती केली जाणार आहे. या जलमहोत्सवादरम्यान गावागावांत पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देण्यात येणार असून फील्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे.

तसेच प्रत्येक गावात जलसंवर्धनासाठी युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘यंग ब्रिगेड’ स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनाविषयी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे.

या कालावधीत गाव व पंचायत समिती स्तरावर लोकसहभागातून ‘लोक जल उत्सव’ आयोजित केले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याला सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व देणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल-दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे तसेच आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा या जलमहोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande