
कोल्हापूर, 06 मार्च (हिं.स.)। ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच पाणी संवर्धनाबाबत जनजागृती आणि सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्ह्यात ८ ते २२ मार्च या कालावधीत ‘जलमहोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
या महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील गावोगावी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पाण्याच्या संवर्धानासाठी स्थानिक परंपरा यांचा उपयोग मुख्यत: विचारात घ्यावेत तसेच पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. गावस्तरावर लोक सहभागातून जल उत्सव आयोजित केला जाईल.
गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे, फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे, प्रत्येक गावात युवकांचा जल सवर्धनासाठी सहभाग घेणे. जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धाचे आयोजन करणेत येणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धानासाठी उपाययोजनांचा समावेश करण्यासाठी भर देण्यात येणार असल्याची माहिती जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar