जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 15 कोटी 77 लाखाचा निधी मंजूर
जळगाव, 06 मार्च, (हिं.स.) - अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटातून सावरण्यासाठी राज्य शासनाने आता मदतीचा हात पुढे केला असून जिल्ह्यासाठी १५ कोटी ७७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल
जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 15 कोटी 77 लाखाचा निधी मंजूर


जळगाव, 06 मार्च, (हिं.स.) - अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटातून सावरण्यासाठी राज्य शासनाने आता मदतीचा हात पुढे केला असून जिल्ह्यासाठी १५ कोटी ७७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.जानेवारी महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील विविध पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील एकूण ८८८६.९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात होती.

अखेर राज्य शासनाने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५ कोटी ७७ लक्ष ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील १५,९६४ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाकडून मंजूर झालेला हा निधी शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.शासनाच्या धोरणानुसार ही मदत थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. कोणत्याही लाभार्थ्याला मदतीचे वाटप करताना द्विरुक्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिल्या.नैसर्गिक आपत्तीअंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेला हा मदतीचा निधी बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी किंवा इतर कारणांसाठी वळता करून घेऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना द्यावेत, अशा सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande