जळगाव जिल्ह्यात थकीत कर्ज वसुलीसाठी विशेष अभियान
जळगाव, 06 मार्च (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) मार्फत समाजातील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविल्या जात असून मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण झाले आहे. मात्र अनेक लाभधारकांकडून कर्जाची नियमित
जळगाव जिल्ह्यात थकीत कर्ज वसुलीसाठी विशेष अभियान


जळगाव, 06 मार्च (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) मार्फत समाजातील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविल्या जात असून मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण झाले आहे. मात्र अनेक लाभधारकांकडून कर्जाची नियमित परतफेड न झाल्यामुळे नवीन कर्ज मंजूर करताना अडचणी निर्माण होत आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक गोकुलदास पगारे यांनी सांगितले.

महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे व नवीन लाभधारकांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी थकीत कर्जाची वसुली करणे आवश्यक असल्याने, 19 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विशेष वसुली अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत थकीत कर्जदारांना वसुली नोटीस देणे, कर्जदार व जामिनदारांच्या घरी भेट देणे, अंतिम नोटीस पाठवणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. कर्जदारांनी थकीत रक्कम न भरल्यास जामिनदारांविरुद्ध कारवाई करून पगारातून रक्कम कपात करण्याबाबत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल. तसेच धनादेश बँकेत जमा केल्यानंतर परत आल्यास, कन्जुमर अॅक्ट कलम 138 अ नुसार कायदेशीर कारवाई करून न्यायालयात दावा दाखल केला जाईल.

महामंडळाच्या माहितीनुसार, काही लाभधारकांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा इतर कामासाठी गैरवापर केल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल. थकीत कर्जदारांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही भविष्यातील कर्ज योजनांचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा व्यवस्थापक गोकुलदास पगारे यांनी सर्व कर्जधारकांना आवाहन केले आहे की, स्वतःविरुद्ध व जामिनदारांविरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून थकीत रक्कम तात्काळ भरावी.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande