
नाशिक, 06 मार्च (हिं.स.) : कोलंबियातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पाहणीसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांच्या नेतृत्वाखाली सरकारी अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आज रवाना होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या 'ग्लोबल एंगेजमेंट फॉर इलेक्टोरल एक्सलन्स' या उपक्रमाचा भाग म्हणून हे पाच सदस्यीय शिष्टमंडळ दि. ६ ते १० मार्च दरम्यान कोलंबियाला भेट देणार आहे. ८ मार्च रोजी होणाऱ्या कोलंबियन काँग्रेसच्या (संसद) निवडणुकांसाठी हे शिष्टमंडळ आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून काम करेल. चोक्कलिंगम सेथुरामन (मुख्य निवडणूक अधिकारी व प्रधान सचिव, महाराष्ट्र), आशीर्वाद कुमार (जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सोलापूर), मनोहर रामचंद्र पारकर (सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपसचिव, महाराष्ट्र), प्रियेश लखुचंद महाजन (निवडणूक नोंदणी अधिकारी, रामटेक विधानसभा मतदारसंघ, नागपूर), सागर अशोक शिर्के (बूथ लेव्हल ऑफिसर, तलाठी ओझर, ता. निफाड, जि. नाशिक) हे या शिष्टमंडळातील सदस्य आहेत. हा निरीक्षण दौरा पूर्णपणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकारद्वारे प्रायोजित आहे. शिष्टमंडळातील सर्व प्रतिनिधी संपूर्ण प्रवासात कर्तव्यावर सक्रिय (ऑन ड्युटी) असल्याचे मानले जाईल. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV