
लातूर, 06 मार्च (हिं.स.)।
राज्यात नावलौकिक असलेल्या विलास नगर तालुका लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना साईट वरील वजन काट्याची शासकीय प्रतिनिधी सह शेतकरी प्रतिनिधींच्या संयुक्त समितीने /भरारी पथकाने आज तपासणी केली. शासनाच्या पथकातील सदस्यांनी विविध निकषाच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी मांजरा साखर कारखान्याचे काट्यां वर होणारे वजन अचूक नोंदवण्यात आले. त्यामुळे कारखान्याचे वजन काटे अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तीपत्र राज्य शासनाच्या समितीने आज दिले आहे.
भरारी पथकाची अचानक भेट आणि तपासणी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकारी प्रतिनिधी कडून जिल्ह्यातील विविध साखर कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी सुरू असून शुक्रवारी मांजरा सहकारी साखर कारखान्याला या भरारी पथकाने अचानक भेट देऊन पाहणी केली, यावेळी वजन करून गव्हाणी कडे गेलेल्या ऊस वाहनांना परत वजन काट्यावर बोलवून त्यांची भरलेली व रिकामी वजने घेण्यात आली. या चाचणीत वजन अचूक नोंदवण्यात येत असल्याचे भरारी पथकाला दिसून आले आहे
माजी मंत्री आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू असून, कारखान्याचे वजन काटे अचूक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.यावेळी तहसील कार्यालयातील महादेव येमले, वैद्यमापक निरीक्षक तानाजी टेकाळे, लेखापरीक्षक श्रेणी -1 उमेश यादव, ऊस उत्पादक शेतकरी मोहन चामे राहणार गंगापूर ता.जि. लातूर व श्याम शेळके राहणार काळमाथा ता. औसा जि. लातूर कारखान्याचे कार्यकारी संचालक व खाते प्रमुख उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis