
रायगड, 06 मार्च, (हिं.स.)। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत विशेष संधी देण्यात आली आहे. अनेक लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अर्ज भरताना काहींनी नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे काही अर्जांमध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत का, तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत का, या बाबत चुकीची माहिती नोंद झाल्याचे लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांना अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी शासनाने ऑनलाईन माध्यमातून पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे.
या संदर्भातील शासन निर्णय दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला असून दुरुस्ती करण्याची सुविधा ३१ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. यासाठी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत, जेणेकरून लाभार्थींना सहजपणे माहिती दुरुस्त करता येईल.
संबंधित लाभार्थी महिलांनी दिलेल्या कालावधीत आपल्या अर्जातील माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे. वेळेत माहिती दुरुस्त केल्यास लाभ मिळण्यास अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके