
पुणे, 06 मार्च, (हिं.स.)। पुणे शहरातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांमधील कथित अनियमिततेवर जाग आलेल्या प्रशासनाने अंकुश ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अल्पसंख्याक शाळांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यातून (आरटीई) पळवाट काढण्यासाठी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळविलेल्या शाळांची कागदपत्रे आणि प्रवेशाच्या नोंदी आता चौकशीच्या रडारवर आल्या आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांत काही शाळांमध्ये ‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासह शिक्षण विभागाच्या जाचक अटींपासून सुटका मिळविण्यासाठी खासगी शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु