
जळगाव , 06 मार्च (हिं.स.) मार्च महिन्याला सुरुवात होताच जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. तापमानाने ४०शीकडे वाटचाल केल्याने वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान, वाढत्या उन्हाच्या तडाख्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहेत. हा निर्णय सीबीएससी शाळा वगळता सर्व इंगजी माध्यमाच्या शाळांसाठीही लागू असेल.सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने चढत असून उष्णतेचा त्रास वाढत आहे. या परिस्थितीत लहान विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात शाळा सुटताना विद्यार्थ्यांना प्रचंड उन्हाचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करून आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून हा मधला मार्ग काढण्यात आला आहे. उन्हाळ्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील, मात्र माध्यमिक शाळा संहिता नियम ५४.२ नुसार शिकवण्याचे तास कमी करता येणार नाहीत. दररोज किमान चार तास प्रत्यक्ष अध्यापन होणे अनिवार्य आहे, जेणेकरून आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) २००९ च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. ज्या शाळा आधीच दोन सत्रांमध्ये सुरू आहेत, त्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर