जळगाव - महाराजस्व समाधान शिबीर अभियान मार्च ते मे दरम्यान
जळगाव, 06 मार्च, (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यभर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१” राबविण्यात येणार आहे. या अभियानाची अंमलबजावणी मार्च ते मे २०२६
जळगाव - महाराजस्व समाधान शिबीर अभियान मार्च ते मे दरम्यान


जळगाव, 06 मार्च, (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यभर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१” राबविण्यात येणार आहे. या अभियानाची अंमलबजावणी मार्च ते मे २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यात विविध महसूल मंडळ स्तरावर व नगर परिषद / नगर पंचायत स्तरावर एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. या अभियानाचा उद्देश सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे हा आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींबाबत जनजागृती करणे, शासनाच्या डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर वाढविणे आणि Single Day Service Delivery द्वारे विविध महसुली सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणे हा आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना ७/१२ व ८अ उतारे, विविध प्रमाणपत्रे, महसुली नोंदींमध्ये दुरुस्ती, प्रलंबित प्रकरणांचे निराकरण तसेच महसूल कायद्यांबाबत मार्गदर्शन अशा सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तालुक्यांतील विविध महसूल मंडळांमध्ये ७ मार्चपासून महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या महसुली अडचणी, प्रलंबित अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरांमध्ये उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande