
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.) :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, ड्रेनेज लाईन आणि नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी विविध ठिकाणी पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन तांत्रिक सूचना दिल्या तसेच नागरिकांच्या समस्या जागेवरच जाणून घेतल्या.
विजापूर रोड परिसरातील प्रकल्पाच्या जागेवर आढळलेल्या बेकायदा नर्सरीला नोटीस देऊन ती हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच जुळे सोलापूर येथील म्हाडा कॉलनी ते पनाश अपार्टमेंट दरम्यान टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. पाईपलाईन सलग टाकण्याऐवजी ठराविक अंतरावर मॅनहोल (चेंबर) तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या प्रकल्पाच्या जागेवरील अनधिकृत नर्सरींना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. नगरसेविका वनिता पाटील यांनी उपस्थित केलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर आयुक्तांनी रात्री 9 ते 12 या वेळेत पाणी सोडण्याची सुधारित वेळ करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, उपमहापौर देवकर यांच्या विनंतीनुसार शहरात देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. त्यानंतर इंदिरा नगर ते एस.टी. बस स्थानक क्रमांक 2 पर्यंतच्या नाला सफाईच्या कामांचा आढावा घेताना स्वच्छतेबाबत कडक सूचना करण्यात आल्या.
याच दौऱ्यात आयुक्तांनी जवळील मनपा मराठी शाळा क्रमांक 5 ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शाळेतील शैक्षणिक दर्जाचीही पडताळणी केली.
------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड