
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। भामरागडच्या दुर्गम जंगलात काम सुरू केले तेव्हा रस्ते, वीज, पाणी अशी कोणतीही सुविधा नव्हती. आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती आणि आरोग्यसेवेची कोणतीही साधनेही नव्हती. मात्र सातत्याने सेवा दिल्यामुळे त्यांचा विश्वास जिंकता आला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडू लागले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पदमश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, रोप आणि ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अनिल घनवट यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या की, १९७२ साली विवाहानंतर पती डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आदिवासी बांधवांसाठी कार्य सुरू केले. त्या काळी तेथील परिस्थिती अत्यंत कठीण होती. रस्ते, पूल, वीज, पाणी तसेच संवादाची साधने नव्हती. सुरुवातीला आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती. मात्र त्यांची भाषा शिकून आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली. अंधश्रद्धेमुळे अनेक जण मांत्रिकांकडे जात असत; परंतु सातत्याने उपचार करून विविध आजार बरे झाल्यानंतर लोकांचा विश्वास बसू लागला. आरोग्यसेवेबरोबरच शेती आणि शिक्षण क्षेत्रातही काम सुरू करण्यात आले. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याची जाणीव झाल्यानंतर मुलांसाठी शाळा सुरू केली. आज त्या शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे पाहून समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार दिल्यने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड