
विभागांच्या टोलवाटोलवीने अमरावतीकर त्रस्त
अमरावती, 06 मार्च (हिं.स.) : शहराच्या मध्यवर्ती भागातील राजकमल उड्डाणपूल गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने अमरावतीकरांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या पाडकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्यामुळे विविध शंका उपस्थित होत असून विभागांच्या टोलवाटोलवीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा उड्डाणपूल 25 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आला. पुलावर बॅरिकेड लावून वाहतूक थांबवण्यात आल्यानंतर तेथे भिंती बांधण्याची आवश्यकता नसतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर दोन पक्क्या भिंती उभारल्या. या भिंती गेल्या पाच महिन्यांपासून तशाच उभ्या आहेत.
दरम्यान, हा पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे रेल्वे विभागाच्या एजन्सीची यंत्रसामग्री पाडकामासाठी दाखल झाली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील भिंती हटविल्याशिवाय रेल्वे विभाग पाडकाम सुरू करू शकत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळविले असले तरी संबंधित विभागांकडून अद्याप ठोस पावले उचलली जात नसल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे शहरात दोन खासदार आणि तीन आमदार असून महापालिकेतही सत्ता स्थापन झाली आहे. केंद्र व राज्यात सत्ताधारी पक्षाचाच महापौर असल्यानेही राजकमल उड्डाणपुलाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यामुळे प्रशासनाच्या अनास्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, महापालिकेकडून निधीअभावी कामे रखडत असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, खड्डे बुजविण्यासाठीही निधी नसल्यास नागरिकांकडून कर का आकारला जातो, असा संतप्त सवाल अमरावतीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी