अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राला बळकटी देणारा - माजी मंत्री बसवराज पाटील
लातूर, 06 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राला बळकटी देणारा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त
अर्थसंकल्प


लातूर, 06 मार्च (हिं.स.)।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राला बळकटी देणारा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देऊन सन्मानित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी वारंवार कर्जबाजारी होऊ नये, यासाठी बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासोबतच 'मुख्यमंत्री बळीराजा योजने'द्वारे १०० टक्के वीज बिल सवलत आणि सौर कृषिपंपांचा विस्तार करून शेतीला शाश्वत आधार दिला आहे.

केवळ शेतीच नव्हे, तर कृषीशी निगडित पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला 'कृषी समकक्ष' दर्जा देऊन या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा केला आहे. आगामी काळात हवामान बदलाचे संकट ओळखून जलयुक्त शिवार आणि ३०० कोटी वृक्ष लागवडीसारख्या योजनांद्वारे जलसंधारणावर भर देण्यात आला आहे. तांत्रिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी 'वसुधा' ही मेसेज सेवा आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या योजना थेट बांधापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यात दिसतो.

पायाभूत सुविधांच्या बाबतीत, मुंबई मेट्रो मार्गिका ११ चा विस्तार, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत प्रकल्प आणि अटल सेतू परिसरात विकसित होणारी 'तिसरी मुंबई' यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. २०३० पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलर्सवर आणि २०४७ पर्यंत संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे भव्य उद्दिष्ट फडणवीस यांनी समोर ठेवले आहे. 'महाराष्ट्र अमृतकाल' योजनेतून रस्त्यांचा विकास आणि महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांसाठी केलेली तरतूद, हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक आकड्यांचा खेळ नसून महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचा पाया असल्याचे अधोरेखित करते. एकंदरीत महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समोर नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे बसवराज पाटील यांनी म्हटले..

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande