रायगड - ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई
रायगड, 06 मार्च, (हिं.स.)। नागरिकांची सुरक्षितता, पक्षी-प्राण्यांचे संरक्षण तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या कृत्रिम पतंगाच्या धाग्यावर म्हणजेच ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंद
manja


रायगड, 06 मार्च, (हिं.स.)। नागरिकांची सुरक्षितता, पक्षी-प्राण्यांचे संरक्षण तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या कृत्रिम पतंगाच्या धाग्यावर म्हणजेच ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम १६३ अंतर्गत जारी केला आहे.

काच किंवा धातूच्या धुळीने लेपित केलेल्या चायनीज मांजामुळे दुचाकीस्वारांसह अनेक नागरिकांना गंभीर दुखापती होण्याच्या तसेच मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय या धाग्यामुळे पक्षी व प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात इजा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा धागा जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्याने पर्यावरणालाही मोठी हानी पोहोचते.

दरम्यान, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत भारत सरकारने कृत्रिम मांजाच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर आधीच बंदी घातली आहे. तसेच विविध उच्च न्यायालयांनीही या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या कोणत्याही कृत्रिम पतंग धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक, पुरवठा तसेच वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर **भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून संबंधित साहित्य जप्त करण्यात येईल. हा आदेश २८ फेब्रुवारीपासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande