
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। पिंपरी महापौर रवी लांडगे यांच्यासह दहा नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. महापौर लांडगे यांच्या जातप्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समितीकडे सुनावणी होणार असून, तक्रारकर्ते मृणाल ढोले यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. त्यामुळे महापौरांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी कुणबी दाखल्याच्या आधारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढविली आहे. यामध्ये महापौर लांडगे यांच्यासह भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे, ज्ञानेश्वर जगताप, तानाजी बारणे, नगरसेविका आरती चौंधे, रेखा देवकर, अर्चना करंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेविका मनीषा लांडे, नगरसेवक विकास साने आणि शिंदेसेनेचे विश्वजीत बारणे हे दहा नगरसेवक कुणबी दाखल्याच्या आधारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. या दहाजणांच्या कुणबी दाखल्याबाबत पुण्यातील मृणाल ढोले-पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु