
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी)‘महिला सन्मान योजनें’तर्गत विभागाला (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या १३ महिन्यांच्या कालावधीत १३२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एकूण तीन कोटी ३६ लाख महिलांनी निम्म्या दरात प्रवास केल्याची नोंद पुणे एसटी विभागाने केली आहे.राज्य शासनाने १७ मार्च २०२३ पासून एसटी महामहंडळामध्ये महिलांना ५० टक्के सवलतीमध्ये आराम, निमआराम, शिवशाही, ई-शिवाई बसमधून कोठेही प्रवास अशी महिला सन्मान योजना सुरू केली. जानेवारी तेडिसेंबरपर्यंत (२०२५) तीन कोटी १३ लाख महिलांनी प्रवास केल्याची नोंद एसटी महामंडळाकडे झाली. यातून महामंडळाला १२० कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला.
नवीन वर्षातही जानेवारी (२०२६) अखेरपर्यंत २२ लाख ७८ हजार महिलांनी योजनेचा लाभ घेतला. यातून ११ कोटी १७ लाख ७१ हजार उत्पन्न एसटीला मिळाले.तसेच गाड्यांची संख्या कमी असताना देखील पूर्वीची प्रवासी संख्या ओलांडली आहे. पुणे एसटी विभागात २०२४ मध्ये दोन कोटी ५८ लाख ६२ हजार ४२ महिलांनी महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला, तर योजना सुरू झाल्यापासून डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत चार कोटी ५९ लाख ८३ हजार ८१३ महिलांनी लाभ घेतला आहे.राज्य सरकारच्या महिला सन्मान योजनेला पुणे विभागातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांचे नियोजन करून महिला प्रवाशांना प्राधान्य देण्याबाबत चालक, वाहकांना निर्देश देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु