
मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शेती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यांना प्राधान्य देत “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरनाईक म्हणाले की, राज्यातील रस्ते, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार, दळणवळण सुलभ करण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांची घोषणा आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देणारे निर्णय राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील.
तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम आणि उद्योग-स्टार्टअप क्षेत्राला मिळणारे प्रोत्साहन यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“हा अर्थसंकल्प केवळ खर्चाचा नाही तर भविष्यातील विकासाची गुंतवणूक आहे. राज्यातील सर्व घटकांचा विचार करून सादर करण्यात आलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प महाराष्ट्राला प्रगत आणि सक्षम बनविण्यास निश्चितच मदत करेल,” असेही प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर