
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। पुणे शहराच्या पश्चिम ते दक्षिण भागाला जोडणाऱ्या वाकड-कात्रज-शेवाळेवाडी मेट्रो मार्गासाठी प्राथमिक पाहणी केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने महामेट्रोला पत्र पाठवून या प्रस्तावित मार्गाचा सर्वंकष वाहतूक आराखड्यात समावेश करता येईल का, याची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
कात्रज-देहूरोड या बाह्यवळण मार्गावर अवजडसह छोट्या वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच या महामार्गाच्या दोन्ही बाजूने लोकवस्तीही वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी या महामार्गालगत मेट्रो करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महामेट्रोने महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता. त्यास उत्तर देताना महापालिकेने प्रथम या मार्गाची गरज आणि व्यवहार्यता तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुण्यासाठी तयार केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात मेट्रो विस्तार, बससेवा सुधारणा, पूल व रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे वाकड-कात्रज-शेवाळेवाडी या मार्गावरील प्रवाशांची संभाव्य संख्या, खर्चाचा अंदाज, तांत्रिक अडचणी, भूसंपादनाची आवश्यकता आणि वाहतूक कोंडीवरील परिणाम या सर्व बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे. ही चाचपणी सकारात्मक ठरल्यानंतर पुढील टप्प्यात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, वाहतूक मोजणी, तांत्रिक सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु