
अमरावती, 07 मार्च (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्यातील बळीराजासाठी 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी' योजनेची घोषणा केली आहे. या निर्णयाचे प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्वागत केले असले, तरी योजनेतील काही अटींवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये पुरेसे नसून त्यांना किमान दीड लाख रुपये मिळावेत, अशी मागणी करत बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच त्यांनी सर्व शेतकरी नेत्यांची बैठक देखील बोलावली आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने मध्यस्थी करत शेतकरी कर्जमाफीसाठी जून २०२६ ची मुदत दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनुसार, सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत कर्ज न फेडू शकलेल्या शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेले हे आश्वासन अर्थसंकल्पात पूर्ण केल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, बच्चू यांनी या योजनेत काही त्रुटी दाखवत प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरकारच्या या निर्णयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र, यामध्ये काही त्रुटी आहेत. दुष्काळामुळे होरपळलेल्या चालू कर्जदारांनाही यातून दिलासा मिळायला हवा होता. तसेच, जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज भरतात, त्यांना केवळ ५० हजार रुपये देणे अन्यायकारक आहे. त्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने समतोल राखला जाईल.
शेतकरी नेत्यांची बोलावली बैठक
कर्जमाफीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बच्चू कडू आता आक्रमक झाले आहेत. येत्या १४ किंवा १५ तारखेला ते राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर आणि रविकांत तुपकर यांच्यासह सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सरकारसमोर पुढील मागण्या कशा मांडायच्या आणि आंदोलनाची दिशा काय असेल, यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी