
छत्रपती संभाजीनगर, 07 मार्च (हिं.स.)। जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “सन्मान ‘ती’चा – अभिमान छत्रपती संभाजीनगरचा” ही सुपर वुमन बाईक रॅली २०२६ चे आयोजन रविवार दि.८ रोजी सकाळी साडेसात वा. करण्यात आले आहे. या प्रेरणादायी उपक्रमात जिल्ह्यातील सर्व विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या संकल्पनेतून ही विशेष रॅली आयोजित करण्यात आली आहे. महिलांच्या आत्मसन्मान, धैर्य, नेतृत्व आणि सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.
या रॅलीचे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण या करणार आहेत.
रविवारी दि.८ रोजी सकाळी साडेसात वाजता क्रांती चौक येथून ही बाईक रॅली सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला प्रारंभ होईल. त्यानंतर पैठण गेट, तापडिया रंगमंदिर मार्ग, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत औरंगपुरा भाजी मंडी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप होईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांतील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या उपक्रमास यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या रॅलीत सहभागी होण्यासाठी QR कोड देण्यात आला असून तो स्कॅन करून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व महिलांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis