अकोल्यात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ‘साधना सप्ताह’ आयोजित
अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशातील शासकीय विभागातील अधिकारी आणि कर
अकोल्यात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी  ‘साधना सप्ताह’ आयोजित


अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशातील शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना सक्षम करणे हा आहे.

केंद्र शासनाने साधना सप्ताह राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर, राज्यातही महा-साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल दरम्यान आयोजित केला गेला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत सुमारे 8 लाख 80 हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम आय गॉट कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करून पूर्ण करतील. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील.

साधना सप्ताह हा आयगॉट कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम असून, मिशन कर्मयोगीचा एक भाग आहे. या उपक्रमाद्वारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नवीन कौशल्ये शिकतात, तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवतात आणि कार्यालयीन कामकाज सुकर करण्याच्या पद्धती आत्मसात करतात. हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाईन असून, प्रत्येक सहभागी स्वतःच्या सोयीने प्रशिक्षण घेऊ शकतो.

सप्ताह आयोजित करण्यामागील मुख्य उद्दिष्टे म्हणजे – शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, डिजिटल गव्हर्नन्समध्ये सुधारणा करणे, नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, सतत शिक्षण घेणे आणि वेळ व्यवस्थापन सुधारणा करणे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सप्ताहात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande