
अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : वृक्षक्रांती मिशनतर्फे अकोला जिल्ह्यात ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत.
मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी सांगितले की, ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात ठिकठिकाणी यशस्वीरित्या राबविला जात आहे. अकोला जिल्ह्यातील सुमारे ६० शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक जागांमध्ये याआधी वृक्षलागवड झाली आहे आणि यंदाही हा उपक्रम राबविण्याची योजना आहे.
श्री. नाथन यांनी प्रस्तावात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, ई-क्लास जमीनीवरील जागा तसेच एमआयडीसीच्या खुल्या जागांवर स्वस्तिक पद्धतीने वृक्षलागवडीसाठी नि:स्वार्थ सेवा देण्याची तयारी आहे.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी वृक्षलागवडीला चालना मिळावी यासाठी कार्यालयातील जागा, पाण्याची सोय, रोपे, कुंपण आणि यंत्रसामग्री यांसाठी संबंधित यंत्रणांनी मिशनला सहकार्य करावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच मनरेगा अंतर्गत रोपवाटिकेतून, विभागीय वनाधिकारी आणि सामाजिक वनीकरण विभागाद्वारे विनामूल्य रोपे उपलब्ध करून दिली जावीत, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे जिल्ह्यात वृक्षलागवडीला गती मिळेल आणि पर्यावरण संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान होईल, असे अधिकारी सांगतात.
--------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे