परभणी - पेट घेतलेली ऑटो आगीत जळून खाक; जीवितहानी टळली
परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)। वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक पुतळ्यासमोर बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका धावत्या ऑटोने अचानक पेट घेतल्याने तो पूर्णपणे आगीत जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंगळी येथील ज्ञा
पेट घेतलेला ऑटो आगीत खाक; सुदैवाने जीवितहानी टळली


परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)। वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक पुतळ्यासमोर बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका धावत्या ऑटोने अचानक पेट घेतल्याने तो पूर्णपणे आगीत जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पिंगळी येथील ज्ञानेश्वर शंकर दामोधर हे ऑटोने परभणीकडे येत असताना ही घटना घडली. वसंतराव नाईक पुतळ्याजवळ पोहोचताच ऑटोतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ ऑटो रस्त्याच्या कडेला उभा केला. काही क्षणातच ऑटोने पेट घेतल्याने आग भडकली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी अग्निशामक दलाला माहिती दिली. शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत ऑटो पूर्णतः जळून खाक झाला होता. एलपीजी गॅसवर चालणारा हा ऑटो पूर्णपणे नष्ट झाल्याने चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande